पुणे : गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाने एक आनंदाची बातमी दिली आहे. एस. टी. महामंडळातर्फे दर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बसने दोन दिवसीय अष्टविनायक दर्शन यात्रा फक्त १ हजार रुपयात करता येणार आहे.
अष्टविनायक दर्शनाला जाण्याची अनेकांची इच्छा असते, पण अनेकजण महागलेल्या प्रवास खर्चामुळे जाणे टाळतात. यासाठी पुण्यातून शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथून विशेष बस निघणार आहेत.
दरम्यान, अष्टविनायक दर्शनासाठी प्रौढांना शिवाजीनगर ते अष्टविनायक ९९० रुपये, तर लहान मुलांसाठी ५०० रुपये दरात जाता येणार आहे. तर पिंपरी-चिंचवड ते अष्टविनायक प्रवासादरम्यान प्रौढांना १००५, तर लहान मुलांसाठी ५०५ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहे.
यावेळी बोलताना पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड म्हणाले की, गणेश भक्तांना अष्टविनायक यात्रा करायची असेल तर त्यांना बस स्थानकावर अथवा www.msrtc.gov.in या संकेतस्थळावरून आरक्षण करता येईल. तर दोन दिवसांच्या या प्रवासादरम्यान ओझर येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना खर्च हा वैयक्तिक करावा लागणार आहे. तरी, भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे..