पुणे : शिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 24 मे ते 6 जून या काळात अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 26 एप्रिल ते 10 मे या काळात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या युक्त अनुराधा ओक यांनी दिली.
शिक्षक भरतीसाठी ‘आयबीपीएस’ या संस्थेच्या माध्यमातून अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेतली जाणार आहे. ही परीक्षा उमेदवारांना मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देता येईल. 200 गुणांच्या या परीक्षेत 120 गुण अभियोग्यता, तर 80 गुण बुद्धिमत्तेसाठी असतील. या परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांतील भरतीसाठी ग्राह्य धरले जातील, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक भरती चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नावाची नोंद ही आधार कार्डमधील नोंदीप्रमाणे असावी. परीक्षेच्या वेळी, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणे अनिवार्य असणार आहे. ऑनलाईन अर्जातील नावात आणि आधारकार्डवरील नावाच्या नोंदीत कोणतीही तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करताना उमेदवाराने तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना अधिक माहिती http://www.mscepune.in/ या वेबसाईटवर देण्यात आली आहे.