उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीची तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात उरुळी कांचन येथील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश बाजीराव तिंबोळे (वय-27, रा. दत्तवाडी, घुले वस्ती, उरुळी कांचन) असे फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ऑगस्ट 2024 मध्ये फिर्यादी तरुणीकडून आरोपी आकाश तिंबोळे याच्याकडे एकूण 14 तोळे सोन्याचे दागिने व 40 हजार रुपये रोख अशी एकूण 11 लाख 60 हजार रुपयांची मालमत्ता दिली होती. परंतु, आरोपीने संबंधित मालमत्ता परत न करता तिची फसवणूक केली व कुठेतरी विल्हेवाट लावली. तसेच, पैसे व दागिने मागितल्यावर धमकी देण्यात आली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी गु.र.नं. १२९/२०२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३५१(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.