बापू मुळीक
सासवड : आजच्या युगामध्ये सध्या तरी नोकरी करणारा हा साहेब, व्यवसाय करणारा उद्योजक, व्यापारी हा शेठ, मात्र सामान्य शेतकरी हा थकबाकीदार होत चालला आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था बिकट, दयनीय झालेली दिसून येत आहे. त्याचा प्रत्यय हा चव्हाट्यावर आलेला दिसत आहे.
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला वाली कोण आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना तर आश्वासित केले होते की, आमचे सरकार आले की, सातबारा ‘कोरा ‘कोरा करणार, परंतु असे आत्तापर्यंत काही दिसून आले नाही. शेतकऱ्यांना पोकळ आश्वासन का दिले. आम्ही तुम्हाला विचारायला आलो होतो का? की आमचे कर्ज माफ करा, परंतु जे आश्वासन दिले त्याची पूर्तता करता येत नाही. तर अजिंठावर कर्जमाफी करणार असे, फक्त मते मिळवण्यासाठी केले का? सामान्य शेतकऱ्यांची एक ही व्यथा आहे.
शेतकरी हा मोठ्या कष्टाने आपल्या शेतामध्ये राबत असतो, घेतलेल्या पिकाच्या उत्पनातून अंदाज घेत येणाऱ्या, पुढील भविष्यकाळात कर्जाचा हिशोब चुकता करण्यासाठी स्वप्न बघत असतो. परंतु अनेक वेळा दुष्काळांची छाया, निसर्गाची अवकृपा, रोगाचा प्रादुर्भाव अशा विविध दुष्ट चक्रांची नजर ही शेतकऱ्यांना भेडसावत असते. तरी त्यावर मात करून, मोठ्या जिद्दीने हा शेतकरी आपल्या शेतामध्ये राबत असतो. काळया आईच्या उदरातून पिकांच्या माध्यमातून मोती, सोने आणि हिरे पिकवण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्यक्षात सोन्या, चांदीच्या, मोती किंवा हिरा दर दिवसोदिवस गगनाला भिडत आहेत.
शेतात पिकवलेल्या सोन्यासारख्या मालाचे दर भाव ठरविण्याच्या अधिकार त्या बळीराजाला नाही. कधी कवडीमोल किमतीत, तर कधी तोट्यात शेतमाल त्यांना विकावा लागतो. सरकारच्या माध्यमातून हमीभाव दिलेला तोकडा पडतो. यावर शासन लक्ष देत नाही.
दुसरीकडे उत्पादित केलेल्या वस्तूंचे दर त्यांची किंमत ही वाढताना दिसते. याचमुळे संसार करताना, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न करताना, शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. यासाठी या कर्जामुळे शेतकरी हा कायम कर्जाच्या रूपात बुडलेला दिसतो. म्हणूनच वर्षाच्या शेवटला नोकरी करणारा, व्यापार व व्यावसाय करणारा, यांचा हिशोबाच्या वहीवर कधीच वजाबाकी नसते, तर बेरीजच दिसून येते. परंतु या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाची किंमत, ग्राहक ठरवत असतो. त्याचा सातबारा मात्र हा कर्जाच्या आकड्यामुळे सातत्याने भरलेलाच दिसून येतो, हे नक्की?
कष्टकरी शेतकरी धरणी मातेची भूक भागवतो, सर्वांना घेऊन शेतीचा उरी वसा त्याच्या शेतमालाच्या किमतीचा काही नाही भरवसा, ज्यावेळी त्याला शेतमालाच्या किमतीचा मिळेल भरवसा, तेव्हाच त्याचा भरवसा राहील. बळीराजाची व्यथा सरकारला दिसत नाही का? सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारकडून आश्वासनाची पूर्तता कधीच होत नाही आणि बळीराजाच्या सातबारा यावरील कर्जाच्या आकड्याची संख्याही कधीच कमी होत नाही. हे विदारक दृश्य सातत्याने पहावयास मिळत आहे. परंतु जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाची व्यथा मात्र या सरकारला समजत नाही का? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.