उरुळी कांचन, (पुणे) : किरकोळ कारणावरून पती पत्नीसह 6 जणांनी एका 24 वर्षीय हॉटेल चालकाला लोखंडी पाईप, फायबरच्या दांड्याने तसेच लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुरूदत्त अपार्टमेंन्ट, खेडेकर मळा परिसरात बुधवारी (ता. 12) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
माणिक अंगद घाडगे, त्याची पत्नी, निकीता माणिक घाडगे (रा. दोघेही गुरूदत्त अपार्टमेंन्ट, खेडेकर मळा, उरूळी कांचन ता. हवेली), अनिकेत कदम व इतर तीन अनोळखी युवक (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी मारहाण केलेल्यांची नावे आहेत. तर संदेश रंगनाथ जाधव (वय 24), (रा. गुरूदत्त हॉटेल, खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश जाधव यांचे उरुळी कांचन येथील खेडेकर मळा परिसरात हॉटेल आहे. बुधवारी (ता. 12) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरातील साहित्य गाडीत भरत असताना माणिक अंगद घाडगे व त्याच्या सोबत असलेले चार मित्र आले. यावेळी माणिक घाडगे याने हातात असलेल्या लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. अनिकेत कदम याने डोक्यात पुन्हा फायबर दांडा मारल्याने जाधव यांना चक्कर आली व ते खाली बसले.
तेवढयात त्याच्या तीन मित्रांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यातुन रक्त वाहू लागल्याने माझा मावस भाऊ प्रेम विजय राक्षे हा मला घेऊन गणराज हॉस्पिटल येथे आणले आहे. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ करीत आहेत.