मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आणि ज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येच्या तपासात देखील महत्वाचा सहभाग होता. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने देवेन भारती यांच्यावर सोपवली होती .
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी देखील त्यांनी मुंबईत सहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिल आहे. तसेच ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख राहिले आहेत.दरम्यान देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा 5.30 वाजता पदभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेंद्र भारती यांची ओळख आहे.
तसेच भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त होते. तसेच त्यांनी याआधी मुंबईतील काही हायप्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास केला आहे.