पुणे : राज्यातील १३ जिल्हे वगळून इतर २३ जिल्ह्यांमधील तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या तलाठी परीक्षेच्या कार्यवाहीबाबत भूमी अभिलेख विभागाकडून कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात तलाठी भरतीच्या रिक्त जागांसाठी भूमी अभिलेख विभागाने परीक्षा घेतली.
राज्यभरातून ४ हजार ४६६ जागांसाठी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अर्जाची संख्या मोठी असल्याने तीन टण्यांत आणि एका दिवसात 3 सत्रांत घेण्यात आली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती.
संपूर्ण परीक्षेत एकूण ५ हजार ७०० प्रश्नापैकी दोन हजार ८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांनी नोंदविले होते. त्या आक्षेपापैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी नऊ हजारांहून अधिक आक्षेप घेण्यात आले होते. तलीठी परीक्षेच्या मुख्य समन्वयक सरिता नरके उमेदवारांची जास्त संख्या असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागला आहे. गुणवत्ता यादी ही परीक्षा क्रमांकानुसार जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा
दिली, अशा सर्वांचे गुण या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक उमेदवारासमोर त्याने संबंधित परीक्षेतील जिल्ह्याचे नावही यादीमध्ये दर्शविण्यात आले आहे. गुणवत्ता यादी तयार करताना एका सॉफ्टवेअरची मदत घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रातील शंभर प्रश्नांपैकी काठीण्य पातळीनुसार हे गुण देण्यात आले आहेत. हे काम पूर्णपणे ऑनलाइन प्रणालीनुसारच करण्यात आले आहे.
त्यानुसार अंतिम निवड यादी जाहीर करण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहे. पुढील तीन आठवड्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असून अन्य १३ जिल्हे पेसा क्षेत्रातील आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असून निकालानंतर गुणवत्ता यादी, निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे नरके यांनी सांगितले.
महाराष्ट्र तलाठी भरतीचा निकाल आणि गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइट @mahabhumi.gov.in वर अपलोड केली जाईल. उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आणि त्यांचा नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून त्यांचे निकाल पाहू शकतात.