पुणे: सकाळी न्याहारीत पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपई खाल्ल्यानं पोटातील घाण निघून जाते आणि पचनक्रिया सुलभ होते. पपईमध्ये फायबरसह पाण्याचं प्रमाण अधिक असतं. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका होते. पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी पपई हे फळ खूप फायदेशीर आहे.
पपई खाण्याचे फायदे:
पपई खाल्ल्यानं पोट स्वच्छ होतं. पपईमध्ये पपेन हा घटक आढळतो. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त या समस्येपासूनही सुटका होते.
तसेच त्वचा चमकदार करण्यासाठी पपई उपयुक्त आहे. पपईत व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे कोलेजन निर्मितीला मदत मिळते. पपई खाल्ल्यानं चेहऱ्यावरच्या मुरुमांचं प्रमाणही कमी होतं. पपईमुळे त्वचा मऊ दिसते तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
पपई यकृत आणि हृदयासाठीही फायदेशीर ठरते. त्यात पोटॅशियम आणि फायबर असल्यानं, रक्तदाब आणि कोलेस्टरॉलची पातळी कमी राखण्यास मदत होते. पपई यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.