सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि अनेक ठिकाणी तापमान 35 अंशांच्या पुढे गेले आहे. हळूहळू उष्णता वाढत आहे. लो बीपीच्या रुग्णांसाठी उन्हाळा खूप आव्हानात्मक असतो. या ऋतूमध्ये रक्तदाब कमी होण्याचा धोका वारंवार वाढतो. उष्णतेचा शरीरावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, लोकांना बीपीबद्दल या गोष्टी माहित असणे महत्वाचे असते.
उन्हाळ्यात कमी रक्तदाबाची समस्या वाढते. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे शरीरात पाणी आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्तप्रवाहही मंदावतो. यामुळे रक्तदाब कमी होतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते आणि ते नियंत्रित करण्यासाठी शरीराला जास्त घाम येतो, ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्स आणि मीठाची कमतरता देखील निर्माण होते. या स्थितीत, रक्तवाहिन्या पसरतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. उन्हाळ्यात कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
उन्हाळ्यात जास्त काम, प्रवास किंवा शारीरिक हालचालींमुळे शरीर थकते. उन्हाळ्यात जास्त थकवा आणि ताण यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेमुळे, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो, ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि कमी रक्तदाब होण्याची शक्यता वाढते.
सततचा थकवा ठरतो कारणीभूत
सतत थकवा जाणवल्याने शरीराच्या अवयवांच्या योग्य कार्यात समस्या निर्माण होतात, ज्यामुळे लो बीपीची लक्षणे वाढू शकतात. जेव्हा रक्तदाब कमी असतो तेव्हा चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, अंधुक दृष्टी आणि कधीकधी बेशुद्धपणाही येतो. त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.