पुणे प्राईम न्यूज: आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी अनेकजण काहीना काहीतरी प्रयत्न करत असतात. त्यात व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच प्राणायाम हे देखील महत्त्वाचे बनले आहे. प्राणायाम करणाऱ्यांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. मात्र, प्राणायाम करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याने मोठा फायदा होऊ शकतो.
प्राणायाम हा कुठेही बसून करता येतो. पण ती जागा मोकळी आणि हवेशीर असावी. तर अधिक चांगले. आपण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही प्राणायाम करू शकतो. प्राणायाम सकाळी पोट रिकामे असेल, तेव्हा करायला हवे. तसेच, आपण अल्पोपहार केला असेल, अथवा चहा घेतला असेल तर कमीत कमी दोन तासांनंतर प्राणायाम करावे. प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वांत योग्य मानली जाते. प्राणायामामध्ये सराव महत्त्वाचा आहे. तसेच, प्राणायाम करत असताना आजूबाजूची हवा शुद्ध व वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे. प्राणायाम करतेवेळी आरामदायी कपडे परिधान करावेत. जास्त टाईट कपडे घालू नयेत.
तसेच प्राणायाम व योगसाधना करताना निरोगी जीवनासाठी चार मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत. एक चांगला व्यायाम, दुसरे योग्य पोषक व सकस आहार, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची शांत झोप आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. या चारही गोष्टींचे प्रत्येकाने नियमित पालन केले, तर शरीर सुदृढ व निरोगी राहीलच, शिवाय मानसिक ताण-तणावाचे अतिशय चांगल्याप्रकारे समायोजन होते.