पुणे, ता.०२ : शाकाहारी लोकांना काही चटपटीत खावेसे वाटले की त्यांची पसंती असते ती पनीरला. पनीरचे विविध पदार्थ चविष्ट आणि रूचकर केले जातात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी पनीरचे पदार्थ हे विशेष पदार्थ असतात. हल्ली घरात देखील पनीरचे विविध पदार्थ तयार केले जातात. पनीर घरी देखील तयार केले जाते.
पनीर रूचकर लागतेच. पण हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असते. पनीर सेवनाने काही विशेष फायदे जरूर होतात. पनीरमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. त्यामुळे पनीर मधुमेहाशी अगदी प्रभावीपणे दोन हात करते. मधुमेही रुग्णांनी आहारात पनीर सेवन करावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी प्रभावी ठरते.
पनीरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हाडे आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर कॅल्शिअम, फॉस्फरसचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. नियमित पनीरचे सेवन केल्यास हाडांच्या समस्या, सांधेदुखी आणि दंतरोग यांच्यापासून बचाव होतो. पचन आणि पचनसंस्था यांच्यासाठी मेटाबोलिझमची भूमिका महत्त्वाची असते. पनीरमध्ये पचनयोग्य तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जेवण पचणे सोपे जाते. पचनसंस्थेचे कार्य सुयोग्य पद्धतीने चालण्यासाठी ते फायदेशीर आणि महत्त्वपूर्ण असते.
शरीराला मिळते ऊर्जा
पनीर हे दुधापासून बनवले असल्याने पनीरमध्येही दुधाचे गुण येतातच. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी पनीरचे सेवन करणे फायदेशीर असते. शरीरयष्टी संपादन करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांनी पनीर सेवन केल्यास त्याचे विशेष फायदे होतात. पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.