Dog Bite Tip :- सध्या भटक्या कुत्र्यांची समस्या खूप गंभीर स्वरूप धारण करत असून शहरांमध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सोशल मीडियावर देखील अनेक लहान मुलांचा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जीव गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
जीवघेणा आजार होण्याची शक्यता..
सगळ्यांना माहिती आहे की कुत्रा चावल्यामुळे रेबीज नावाचा जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते व यामुळे अनेक लोक या आजाराचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे कुत्रा चावल्यामुळे नेमके ताबडतोब आपल्याला काय करता येईल किंवा काय करावे याबद्दल महत्वाची माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे असते. याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावे याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
कुत्रा चावला तर सगळ्यात अगोदर काय करावे?
याबद्दल तज्ञ म्हणतात की, तुम्हाला ज्या ठिकाणी कुत्रा चावला आहे व जखम झाली आहे त्या जखमेला सर्वात अगोदर साबणाने स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. कारण यामुळे रेबीजचा जो काही व्हायरस असतो तो नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर ड्रेसिंग करून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कुत्रा चावल्यानंतर ताबडतोब देता येतील अशा अँटी सिरम सुद्धा उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही केमिस्टच्या दुकानांमध्ये आपल्याला त्या मिळू शकतात.
या सिरम डॉक्टर कुत्रा चावल्याची जी काही जखम झालेली असते त्याच्या आजूबाजूला टोचतात. या पद्धतीचा उपचार ताबडतोब करणे गरजेचे आहे. म्हणजेच कुठल्याही वेळ न घालवता ज्या दिवशी तुम्हाला कुत्र्याने चावा घेतला अगदी त्याच दिवशी ही सिरम टोचून घेणे आवश्यक आहे. समजा कुत्रा चावल्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जर हे सिरम टोचले तर याचे खूप चांगले परिणाम बघायला मिळतात.
तसेच तज्ञांच्या मते अँटी रेबीज कोर्स घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन हातामध्ये किंवा दंडामध्ये आपण घेऊ शकतो व हा सहा इंजेक्शनचा संपूर्णपणे कोर्स आपल्याला पूर्ण करावा लागतो. या गोष्टींचे तंतोतंत पालन केल्यामुळे रेबीज रोग आपल्याला टाळता येणे शक्य आहे.
तसेच कुत्रा चावल्यामुळे जर रक्तस्राव व्हायला लागला तर तो थांबवण्यासाठी बँडेज किंवा पट्टी जखमेवर बांधावी. तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे अँटिसिरमचा वापर केला तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.कारण कुत्र्याच्या लाळेतून जो व्हायरस निर्माण होत असतो तो व्हायरस या सिरममुळे नष्ट होण्यास मदत होते. रेबीजचा व्हायरस पसरू नये याकरिता कुत्र्याने चावा घेतल्यानंतर एक ते दोन तासातच उपचार घेणे गरजेचे आहे.
लहान मुलांसाठी अशी काळजी घ्यावी…
लहान मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या अनेक घटना घडताना दिसून येतात. बऱ्याचदा मुलं खेळत असताना त्यांना कुत्रा चावून जातो व आपल्याला याची कल्पना देखील बऱ्याचदा नसते. बऱ्याचदा जखम पाण्याने धुऊन ठेवणे किंवा त्याला हळद लावणे किंवा इतर घरगुती उपचार करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. परंतु यामध्ये इतके दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते. कारण कुत्र्याने चावणे ही साधी सोपी गोष्ट नाही.
कारण कुत्रा हा रेबीज या जीवघेण्या आजाराचा वाहक आहे. पाळीव कुत्रा सुद्धा पिसाळू शकतो हे देखील तेवढे सत्य आहे. पारंपारिक कुत्र्यांना जर एखाद्या रस्त्यावर फिरणारा भटका कुत्रा चावलेला असतो व अशावेळी बऱ्याचदा घरातील पाळीव कुत्रा देखील अचानक चावायला लागतो व त्यामागे त्याला एखादा भटका कुत्रा किंवा रस्त्यावरील कुत्रा चावला असेल त्यामुळेच असे घडते. परंतु लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे कोणताही कुत्रा चावला तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने ताबडतोब उपचार घेणे खूप गरजेचे आहे.
कुत्र्यांपासून अशाप्रकारे सावध रहा..
याविषयी तज्ञ म्हणतात की, कुत्रा हा अतिशय प्रिय प्राणी असून अनेक घरांमध्ये लोक कुत्रा पाळतात. परंतु कुत्रा पाळताना देखील काही काळजी घेणे खूप गरजेचे असते. अनेक लोक रस्त्यांवरचे कुत्र्यांना देखील खाऊ घालतात व त्यांच्यावर काही उपचार देखील करतात. परंतु या गोष्टी करताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
जागरूक नागरिकांनी आजूबाजूला जे कुत्रे आहेत त्यांची नसबंदी केली आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. नसबंदी केली नसेल तर ती करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. शक्य असेल तर कुत्र्यांना लसीकरण करून घेतले पाहिजे. या व अशा अनेक प्रयत्नांनी आपण रेबीज आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. कारण या आजारावर जर वेळीच उपचार झाले नाही तर माणसाचा मृत्यू देखील होण्याची दाट शक्यता असते.