मुंबई: सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सीबीआयला गैरप्रकाराचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचं त्यांनी अहवालात नमूद केले आहे. सखोल तपासानंतर, सीबीआयला राजपूतच्या मृत्यूमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा हत्येचा पुरावा सापडला नाही. एजन्सीच्या अहवालात असे म्हटले आहे की, अभिनेत्याचा मृत्यू फाशीमुळे झाला होता आणि त्याची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नव्हते. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला आव्हान देण्यासाठी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाकडे मुंबई न्यायालयात निषेध याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. सुशांतच्या कुटुंबाने यापूर्वी आरोप केला होता की, सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती त्याच्या मृत्यू प्रकरणी सहभागी होती, परंतु सीबीआयच्या तपासात या दाव्याला समर्थन देणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीला CBI कडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
रिया चक्रवर्ती आणि इतरांची सीबीआयने कसून चौकशी केली आहे. तपासादरम्यान, सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि राजपूतशी संबंधित इतर अनेक लोकांची चौकशी केली आहे, ज्यात त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी यांचा समावेश होता. तथापि, एजन्सीला त्यांच्या मृत्यूमध्ये कोणाचा सहभागी असल्याचा, किंवा अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणी कोणी कट रचल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.
१४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. मृत्यूच्या वेळी अभिनेता ३४ वर्षांचा होता. सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती, परंतु नंतर ती सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, काही लोकांनी तपास पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे, तर काहींनी एजन्सीच्या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयासमोर आपले निष्कर्ष सादर केले आहेत, आता ते अहवाल स्वीकारायचे की एजन्सीला अधिक तपास करण्याचे आदेश द्यायचे ते न्यायालय ठरवणार आहे.