पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना राबविण्यात येते. या योजनेत इयत्ता १०वीसाठी १५ हजार तर आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे इयत्ता १०वी व १२वीत ८० टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी २२ आॅगस्ट ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती समाज विकास विभागाने दिली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२२ परीक्षेत जे विद्यार्थी ८० टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन जे विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण झाले आहेत. ज्यांचे इयत्ता ११ वी व पदवी प्रवेश निश्चीत झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो. या योजनेचे अर्ज २२ आॅगस्ट पासून dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज
पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, रात्रशाळेतील विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ८० ऐवजी ७० टक्केपेक्षा जास्त गुण असल्यास योजनेसाठी अर्ज करता येतो.कचरा वेचकाची मुले, बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी, ४० टक्के दिव्यांगत्व असलेले विद्यार्थी, सर्व असंघटित कष्टकरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर त्यांनाही या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती संकेतस्थळावर पाहा.