पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियम तयार करण्याच्या अनुषंगाने आणि प्रवेशप्रक्रियेत अधिक सुलभता यावी, या उद्देशाने पालकांकडून अभिप्राय मागवण्यात येत आहेत. येत्या २५ एप्रिलपर्यंत हे अभिप्राय स्वीकारले जाणार असून अधिकाधिक पालकांनी अभिप्राय द्यावेत, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक व आर्थिक मागास संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीत काही बदल करावेत, अशी मागणी विविध पालक संघटनांकडून केली जात आहे. आरटीईच्या नियमावलीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे संस्थाचालकांकडूनही सांगितले जात आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियमावली तयार करण्याच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने २५ एप्रिलपर्यंत अभिप्राय मागवले आहेत.