पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील ऑक्टोबर २०२४ व मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यामुळे चालू शैक्षणिक वर्षातील दोन्ही सत्रांचा अभ्यासक्रम नियोजित वेळेत पूर्ण करता येणार असून, परीक्षेचे आयोजन आणि विद्यार्थ्यांनादेखील अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
कोव्हिड महामारीनंतर विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले होते. अनेक परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. तसेच निकाल विलंबाने जाहीर झाले. विस्कळीत वेळापत्रकाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे परीक्षा विभागाकडून वेळेत निकाल लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. पुनर्मूल्यांकन, छायांकित प्रतींचे अर्ज वेळेत निकाली काढण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने लवकर वेळापत्रक जाहीर केले आहे.
याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, कोव्हिडनंतर परीक्षा विभागाने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. २०२४ सत्राच्या एकूण १३९ अभ्यासक्रमांच्या विविध परीक्षा आणि निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात यश आले. निकाल वेळेत जाहीर झाल्याने पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तत्काळ श्रेयांक पत्रिका देण्याचे काम परीक्षा विभागांमार्फत सुरू आहे.