Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता.२३ : नवरात्र म्हणजे महिलांना शक्ती आणि ऊर्जा देणारा उत्सव. संयम व आत्मविश्वासाच्या बळावर तिने प्रत्येक क्षेत्रात गरूडझेप घेतली आहे. घर आणि समाजातील मिळणारी जबाबदारी सांभाळताना मुलांवर संस्कार करण्यातही ती कुठेच कमी पडत नाही. कुटूंब सांभाळताना समाजाने गाव सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. तिला यशस्वीपणे सांभाळत तिने कर्तृत्वाचा मोठा वाटा यशात बदलला आहे, असे प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी सांगितले.
नऊ देवींची रूपे धारण करून वेशभूषा परिधान
नवरात्र महोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गरबा व दांडियाचे कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्या पौर्णिमा शेवाळे बोलत होत्या. शाळेच्या इन्चार्ज सुलताना इनामदार, शिक्षिका मानसी चव्हाण, रूपाली झगडे, शाहीन शेख, श्वेता पवार, अरुणा बनसोडे, अंजली कवडे, गेयती टिळेकर, प्रिया बंडगर, अश्विनी शिंदे आदी उपस्थित होते.
गरबा व दांडियामध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी रंगीबिरंगी कपडे परिधान केले होते. इयत्ता सातवीच्या रजनी शिरसाठ या विद्यार्थिनीने नवरात्रीनिमित्त थोडीशी माहिती दिली. तसेच इयत्ता दुसरी, सहावी आणि आठवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. लहान मुलींनी नवरात्रीनिमित्त होणाऱ्या उत्सवामध्ये नऊ देवींची रूपे धारण करून वेशभूषा परिधान केली होती.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका पवार यांनी तर आभार प्रदर्शन हर्षा शितोळे यांनी मानले.