पुणे : एनएमएमएस शिष्यवृत्ती योजना अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे़. आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षे’साठी(एनएमएमएस) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी दीड लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत होती. आता पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. तसेच एनएमएमएस परीक्षेद्वारे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना याआधी इयत्ता नववीपासून ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असे. आता शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
आता साडे तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना देखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. यंदा ही परीक्षा १८ डिसेंबर रोजी होणार आहे
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज परिषदेच्या ‘https://www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in’ या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध आहे