पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (२५ टक्के) राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी गुरुवार ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आरटीईचे राज्यभरातून केवळ ५० टक्के प्रवेश झाले आहेत. बहुतांश पालकांना वेळेत कागदपत्रे न मिळाल्याने त्यांना प्रवेश घेता आला नाही. तर पूरस्थितीमुळे काही पालकांना वेळेत प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे रिक्त जागांवर प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून ३१ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती. यानंतर ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. परंतु, राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर आणि पूरस्थितीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश न घेतलेल्या पालकांना ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. यानंतर प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून कळवण्यात आले आहे. आता पालकांना आणखी तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरातून आतापर्यंत ५५ हजार ३६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर प्रवेशासाठी राज्यभरातील शाळांमध्ये ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यामुळे पालकांना दोन दिवसांत प्रवेश निश्चित कराते लागणार आहेत.