पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांची प्रवेशप्रक्रिया सुरू होताच पहिल्याच दिवशी पालकांनी मोठ्या संख्येने अर्जनोंदणी केली. जुन्या पद्धतीनुसार प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार असून, पालकांना मगसगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे २१ हजारापेक्षा अधिक पालकांचे अर्ज पहिल्या दिवशी निश्चित झाले.
राज्य शासनाकडून आरटीई कायद्यात बदल करून नव्या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. या बदलांना पालक आणि शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला. अर्जनोंदणीकडे पालकांनी पाठ फिरवली. तसेच कायद्यातील बदल रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी काही संस्थांनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर उच्च न्यायालयाने शासनाने केलेल्या बदलाला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन लिंक खुली झाली असून, २१ हजार ४५८ पालकांचे अर्ज निश्चित झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मेपर्यंत आहे. राज्यभरातून ९ हजार १३६ शाळांमध्ये यंदा प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी १ लाख २ हजार ४२८ इतकी प्रवेशक्षमता आहे. त्यामुळे यंदा विक्रमी संख्येने अर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही.