नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार 2000 रुपयांच्या बहुतांश नोटा पुन्हा आरबीआयकडे परत जमा झालेल्या असल्या, तरी 10,000 कोटी रुपयांच्या नोटा अद्यापही आरबीआयकडे परतलेल्या नाहीत. शक्तीकांत दास यांनी सांगितले की, 2000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत. आता फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. या नोटाही जमा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरबीआयने 6 ऑक्टोबर रोजी माहिती दिली होती की, सुमारे 12000 कोटी रुपयांच्या अशा नोटा अजूनही चलनात आहेत आणि त्या आरबीआयकडे परत आलेल्या नाहीत.
दरम्यान दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “2000 रुपयांच्या नोटा परत येत आहेत आणि आता फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात उरल्या आहेत. आशा आहे की, या नोटाही परत येतील.” यापूर्वी, गव्हर्नर दास म्हणाले होते की, चलनातून काढून घेण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या 87 टक्के नोटा बँकांमध्ये ठेवी म्हणून परत आल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करण्यासाठीची मुदत ही 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. 7 ऑक्टोबरनंतर बँक शाखांमध्ये नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा बंद करण्यात आली. 8 ऑक्टोबरपासून लोकांना रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये नोटा बदलून देण्याची किंवा त्यांच्या बँक खात्यात तितकीच रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात आली होती.