नवी दिल्ली: केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) २६ वे गव्हर्नर असतील. केंद्र सरकारने सोमवारी मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. बुधवार, ११ डिसेंबर रोजी ते आरबीआय गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षे असेल.
संजय मल्होत्रा यांनी आयआयटी कानपूर येथून संगणक विज्ञान विषयात पदवी, तर अमेरिकेच्या प्रिंसटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ५६ वर्षीय मल्होत्रा हे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
राज्य व केंद्र सरकारमध्ये वित्त व कर विभागातील विविध पदांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. धडाडीचे अधिकारी म्हणून मल्होत्रा यांची ओळख आहे. मल्होत्रा यांच्या नियुक्तीसोबत दास यांना गव्हर्नर म्हणून तिसरा कार्यकाळ मिळणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मावळते गव्हर्नर दास यांचा कार्यकाळ मंगळवारी पूर्ण होत आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर शक्तिकांत दास यांची १२ डिसेंबर २०१८ रोजी या पदावर नियुक्ती करण्यात आली. २०२१ साली तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून अजून तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.