नवी दिल्ली: सणासुदीच्या सुरुवातीपासून वाढलेल्या मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये भारताचा पेट्रोलचा वापर ७.३ टक्क्यांनी वाढला आहे, परंतु डिझेलची विक्री ३.३ टक्क्यांनी कमी झाली असल्याचे सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीत दिसून आले आहे. तीन सरकारी मालकीच्या कंपन्यांची पेट्रोल विक्री ऑक्टोबरमध्ये ३.१ दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच महिन्यात २.८७ दशलक्ष टन विक्री झाली होती. डिझेलची मागणी ३.३ टक्क्यांनी घसरून ६.७ दशलक्ष टन झाली. सणासुदीच्या काळात वैयक्तिक वाहनांचा वापर वाढल्याने पेट्रोलची विक्री वाढली होती, तर पावसाळ्याच्या वाढीव हंगामामुळे कृषी क्षेत्रातील मागणी कमी झाल्यामुळे डिझेलची मागणी कमी झाली.
गेल्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलची विक्री मंदावली आहे, कारण मान्सूनच्या पावसामुळे वाहनांची हालचाल आणि कृषी क्षेत्राची मागणी कमी झाली आहे. सप्टेंबरमधील २.८६ दशलक्ष टन वापराच्या तुलनेत मासिक आधारावर पेट्रोलची विक्री ७.८ टक्क्यांनी वाढली आहे. डिझेलची मागणी मात्र सप्टेंबरमधील ५.५९ दशलक्ष टन वापरापेक्षा जवळपास २० टक्क्यांनी जास्त होती.
डिझेलची मागणी ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत १.७ टक्क्यांनी आणि ऑक्टोबर २०२० च्या तुलनेत १२.६ टक्क्यांनी वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात हवाई इंधनाची विक्री वार्षिक आधारावर २.५ टक्क्यांनी वाढून ६,४७,७०० टन झाली. परंतु सप्टेंबरमध्ये विक्री झालेल्या ६,३१,१०० टन इंधनाच्या तुलनेत २.६ टक्क्यांनी कमी होते. पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच एटीएफची मागणीही आता कोविडपूर्व पातळीपेक्षा जास्त आहे.