जीवन शेंडकर
Yawat News : यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा अपघात झाला. तर या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून, भाऊ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
वैशाली नितीन शेंडगे (वय- २८, रा. नायगाव, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विलास विश्वनाथ कोपनर (रा. बोरीभडक, ता. दौंड) असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.
चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा अपघात
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली शेंडगे व विलास कोपनर हे बहिण-भाऊ आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त वैशाली शेंडगे या बंधू विलास यांच्याबरोबर दुचाकीवरून बोरीभडक या ठिकाणी बुधवारी निघाल्या होत्या. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोरीभडक फाट्यावर सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या चारचाकी गाडीने पाठीमागून विलास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत वैशाली शेंडगे या रस्त्यावर पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला मोठ्या जखमा झाल्या. त्यांना तात्काळ उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बंधू विलास कोपनर यांनाही दुखापत झाली आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर चारचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘ती’ राखी ठरली अखेरची
राखी बांधायला आलेल्या बहिणीवर काळाने घाला घातल्याने कोपनर परिवारासह बोरीभडक पंचक्रोशीत शोकाकुल वातावरण पसरले होते. परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. गुरुवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे वैशाली शेंडगे यांचा अंत्यविधी करण्यात आला.
दरम्यान, यवत पोलिसांनी कायदेशीर कारवाई न केल्यास धनगर समाजाच्या वतीने एस पी आफिसवर मोर्चा काढण्यात येईल, असे मत बोरीभडक गावचे माजी सरपंच दशरथ कोळपे यांनी व्यक्त केले