पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात नो एन्ट्री मधुन आल्याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंगकेल्याची घटना घडली आहे. एका महिलेचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. तसेच चाकू काढून पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम रोडवर १७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहित महिलेने १८ फेब्रुवारीला कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरुन अमित आप्पासो चव्हाण (वय-३२ रा. उंड्री, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी अमित चव्हाण आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. महिलेचे आणि आरोपीचे पूर्वी वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास महिला त्यांच्या सासूची वाट पाहात रस्त्यावर थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने महिलेचा हात पकडून जवळ ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच चाकू काढून पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे. तक्रार मागे घेतली नाहीतर तुला आणि तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, तसेच तु एकटी कुठे भेटली तर तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.