उस्मानाबाद : ऑन ड्युटी रील्स बनवून एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपाखाली महिला कंटक्टरसह तिचा सहकारी कंटक्टरला निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती कळंब (ता.धाराशिव) आगाराचे व्यवस्थापक मुकेश कोमटवार यांनी दिली आहे.
महिला कंडक्टर मंगल सागर गिरी व तिचा सहकारी कंटक्टर कल्याण कुंभार असे निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब बस आगारातील महिला कंडक्टर मंगल गिरी हिचे व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहेत. विविध प्रकारच्या व्हिडीओमुळे मंगल गिरी चर्चेत आली होती. मंगल हिने चक्क ऑन ड्युटीवरील खाकी वर्दीत बस चालवतानाचे, तसेच प्रवाशांचे तिकीट काढत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले होते. यात तिला तिचा सहकारी कल्याण कुंभार यानेही मदत केली आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप ठेवत महिला कंटक्टरसह तिच्या साथिदाराला निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर छोटे-छोटे व्हिडीओ अपलोड करून रातोरात स्टार झालेले व नशीब पालटलेले किस्से आपण पाहिले आहेत. यात अनेक जण मालामाल झाले आहेत. परंतु सोशल मीडियावर परिवहन महामंडळाच्या खाकी वर्दीवरील व्हिडीओ तयार करणे कळंब बस आगारातील महिला कंडक्टर मंगल सागर गिरी व महिला कंटक्टरसह कल्याण कुंभार यांना महागात पडले आहे.