पुणे: पुणे शहर भाजप शहराध्यक्ष निवडी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. नवीन शहराध्यक्ष निवडण्यासाठी उद्या रविवारी (दि. 27) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मतं जाणून घेतली जाणार आहेत.
पक्षाकडून पाठवण्यात आलेले पर्यवेक्षक आणि निरीक्षक यांच्यापुढे प्रत्येक पदाधिकाऱ्याला शहराध्यक्षपदासाठी योग्य असणाऱ्या तीन जणांची नावे सांगायची आहेत. नावे सांगताना यामध्ये एक नाव महिलेचे असणे बंधनकारक आहे. यामुळे भाजपमधील इच्छुकांकडून आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सध्या पुण्याच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी धीरज घाटे यांच्याकडे आहे. घाटे यांच्या कार्यकालाची मुदत संपल्यामुळे आता नवीन शहराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया प्रदेश भाजपकडून सुरु आहे. या निवडीसाठी पर्यवेक्षक खासदार धनंजय महाडीक, निरीक्षक शेखर इनामदार हे दोघेजण शहर कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत.
सध्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांना परत एकदा संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. याबाबत शहरातील पक्षाचे काही पदाधिकारी देखील अनुकूल आहेत. याबरोबरच पक्षातील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर यांची नावेही चर्चेत आहेत.
यामध्ये माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनीही शहराध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळत आहेत. त्याच प्रमाणे आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर यांचे देखील नाव शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. भाजपमधील महिला नेत्यांची नावे शहराध्यक्षपदासाठी चर्चेत नाहीत. मात्र प्रदेशाकडून शहरातील पदाधिकाऱ्यांना महिलांचे नाव सुचविणेही बंधनकारक केले आहे. त्यामुळे काही महिला नेत्यांना संधी मिळू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास धनंजय महाडीक, शेखर इनामदार हे प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी कोण योग्य आहे हे जाणून घेतील. यावेळी प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहरातील सर्व सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा यासह अन्य मोर्चाचे शहराध्यक्ष, विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार हे नव्या शहराध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविणार आहेत.
यानंतर याचा गोपनीय अहवाल पर्यवेक्षक व निरिक्षकांकडून प्रदेश स्तरावर सादर केला जाईल. त्यानंतर प्रदेशाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा होऊन त्यातील एका नावावर शिक्कामोर्तब केला जाईल व अध्यक्षांची निवड होईल.