पुणे : उन्हाळ्या रात्री गरमी होत असल्याने घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणांनी डोक्याजवळ मोबाईल ठेवले होते. दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन घरात शिरुन डोक्याशेजारी ठेवलेले मोबाईल चोरट्याने लंपास केले. मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरलेले तीनही मोबाईल हस्तगत केले आहेत. कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी (वय 20, रा. लोणावळा) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत रिक्षाचालक अविनाश तानाजी गायकवाड (वय 21 वर्ष , रा. जाई रेसिडन्सी, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार होती. ते, त्यांचा भाऊ अमर गायकवाड आणि मित्र विशाल गायकवाड, शुभम सूर्यवंशी, दशरथ सूर्यवंशी हे 22 एप्रिल रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. 23 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास उठल्यावर त्यांना त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेले 3 मोबाईल संच चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यानंतर हडपसर पोलिसांच्या तपास पथकाला मिळालेल्या बातमीनुसार, पोलिसांनी कन्हैयालाल नटमारवाडी ला अटक केली. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला आहे. त्याने चोरलेले 40 हजार रुपयांचे मोबाईल संच काढून दिले.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापूर लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे यांनी केली आहे.