हनुमंत चिकणे
Uruli Kanchan | उरुळी कांचन, (पुणे) : घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल त्याची चौकशी करण्याचा अर्ज दाखल करून चौकशी सुरू झाल्याचा राग मनात धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचानी एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी माजी सरपंचाविरूध्द लोणी काळभोर पोलिस ठाण्यात विनयभंग, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल राजाराम शितोळे (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचांचे नाव आहे. यासंदर्भात एका २६ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने कोरेगाव मूळसह परिसरात खळबळ उडाली आहे.
घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी माजी सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्याविरूध्द घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी लावण्याबाबत अर्ज केला होता.
सदरील अर्जाची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचा राग मनात ठेवुन शितोळे यांनी काही दिवसांपूर्वी फिर्यादी या पायी जात असताना त्यांना शिवीगाळ करून विनयभंग केला. फिर्यादी या अनुसूचीत जातीच्या आहेत हे माहित असताना देखील त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीचे वडिल शितोळे याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना देखील दमदाटी केली. त्यामुळे विठ्ठल शितोळे याच्याविरूध्द विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई करीत आहेत.
एकाच दिवशी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल…
दरम्यान, कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सचिन गुलाब निकाळजे याने तर चक्क महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्यावरही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!