पुणे : पुणे शहराच्या उच्चभ्रू भागांपैकी एक असणाऱ्या औंध परिसरात भरदिवसा चोरट्यांनी बंगला फोडून तब्बल ६६ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (ता. ११) दुपारी घडली आहे. याप्रकरणी एका ५५ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिंपरी-चिंचवड परिसरात पॅकिंग करणारी कंपनी असून ते औंध येथील बाणेर रोडवरील सिंध हौसिंग सोसायटी याठिकाणी त्यांचा बंगला आहे. रविवारी (ता.११) दुपारी दिडच्या सुमारास ते कुटुंबासोबत जेवण्यासाठी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी पाठीमागील दरवाजाने आत शिरून त्यांनी परकीय चलन व डायमंड आणि सोन्याचे दागिने असा एकूण 66 लाख 42 हजारांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान फिर्यादी दुपारी चारच्या सुमारास परत आले. त्यावेळी त्यांना दरवाजा उघडलेला दिसून आला. तसेच घरातील साहित्य व कपाटातील वस्तू अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.