हडपसर : सासूच्या पाया पडायचे असे सांगून पोलीस ठाण्यातील आवारात पोलिसांसमोरच जावायाने सासूवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकारात सासूच्या गालाला जखम झाली आहे.
मंगेश महादा तारे (वय – २९, रा. वडगावशेरी) असे हल्ला करणाऱ्या जावयाचे नाव आहे. पुष्पा दामोदर पालवे (वय- ४६, महादेव नगर, मांजरी, ता. हवेली) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीचे सासरे दामोदर पालवे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेश तारे आणि पूजा तारे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. पती मंगेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पूजा या आपल्या आईकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले असता आमच्या दोघांमध्ये कसलेही वाद नाही हे सांगण्याचा प्रयत्न मंगेश करीत होता.
दरम्यान, असे असताना मंगेशने सासूच्या पाया पडायचे आहे असे सांगितले. पाया पडतानाच त्याने जर्किंगच्या खिशात भाजी कापण्याचा आणलेला चाकू अचानक बाहेर काढत सासूवर वार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू पुष्पा पालवे यांच्या गालाला जखम झाली.
यावेळेस हडपसर पोलीस ठाण्यातील दक्ष पोलिस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पालवे यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दामोदर पालवे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास हडपसर पोलीस करीत आहेत.