पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोलपंप येथे लोखंडी हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून २८ हजार ८७० रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चार अनोळखी चोरट्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. ११) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत राहुल भिमराव पिंगळे (वय २४, रा. दादाची वस्ती, लोहगाव-वाघोली रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपावर कामाला आहेत. शनिवारी रात्री फिर्यादी व त्यांचे सहकारी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये बसले होते.
रात्री सव्वा अकराच्या सुमारास चार अनोळखी चोरटे तोंडाला कपडा बांधून जबरदस्तीने ऑफिसमध्ये शिरले. त्यांनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने २८ हजार ८७० रुपयांची रोकड घेतली. तसेच फिर्यादी यांच्या सहकाऱ्याच्या मोबाईलचे नुकसान करुन रोकड चोरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पोटे करीत आहेत.