लोणी काळभोर, (पुणे) : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांतऑगस्ट महिन्यात घडलेल्या अत्यंत क्लिष्ट अशा प्रकरणाचा सर्वोत्तम तपास करून छडा लावल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांच्या पथकाला “सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार” देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडून या सर्वांना गौरवण्यात आले आहे.
यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, शिवाजी ननवरे, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, दशरथ चिंचकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पासलकर, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, अतुल डेरे, संदीप वारे, अक्षय नवले निलेश सुपेकर, अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, धीरज जाधव, दगडू वीरकर, राजू मोमीन, विजय कांचन, सचिन घाडगे, अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दत्ता तांबे, हेमंत विरोळे, महेश बनकर, समाधान नाईकनवरे, प्रसन्ना घाडगे, प्राण येवले, प्रमोद नवले यांचा समावेश आहे.
खेड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस हवालदार संतोष मोरे, प्रवीण गेगजे, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, दीपक दराडे, लोणावळा पोलीस ठाण्यातील शकील शेख, राहुल खैरे, यांचाही ‘उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
हत्याप्रकरणातील आरोपी गजाआड..
अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवली असता त्याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर अत्यंत शिताफीने आरोपीचा शोध घेऊन त्याला खेड पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पाच गुन्हे केल्याची कबुली..
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी तपासादरम्यान त्याने पाच गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून दरोडा..
बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योतिष्याकडून मुहूर्त काढून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करण्यात आली होती. यावेळी आरोपींकडून पोलिसांनी ७६ लाख ३२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता व पाच आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
पर्यटकांच्या घरातील वस्तूंची चोरी..
लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणावळा परिसरात बाहेर फिरण्यास गेलेल्या पर्यटकांच्या घरातील वस्तूंची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली होती. यामध्ये आरोपींनी केलेले दहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते.
एटीएम मशीनचा स्फोट घडवून लुटीचा प्रयत्न..
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्फोटकाचा वापर करून ए.टी.एम. मशीनचा स्फोट घडवून लूट करण्याचा प्रयत्न करणारे तिघेजण ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी ३ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
अत्याचार प्रकरणातील आरोपीला २४ तासांत अटक..
जेजुरी पोलीस ठाण्यातील बालकावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आणून २४ तासात एक आरोपी जेरबंद करण्यात आला होता. लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांसह अपहरणाचे दोन गुन्हे उघडकीस आणून दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.