Pune News | तळेगाव ढमढेरे, (पुणे) : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील न्हावरा रस्त्याच्या बाजूला चारचाकी गाडीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
रमेश लक्ष्मण पिंगळे (वय २२, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) व राहुल दौंडकर (रा. चिंचोशी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे असून यातील पिंगळे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर राहुल दौंडकर हा फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पाच किलो गांजासह एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी भास्कर महादेव बुधवंत (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला दोन युवक गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी भास्कर बुधवंत यांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी पोलीस थांबले असता या वेळी त्यांना संशयित काळ्या रंगाची व काळ्या काचा असलेली चारचाकी दिसली.
समोर पोलीस असल्याची चाहूल लागताच कारमधील एक युवक पळून गेला, तर पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेत कारची झडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना पांढर्या रंगाच्या पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. या वेळी पोलिसांनी तब्बल पाच किलो गांजासह कार जप्त केली.
त्यानुसार पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल करत रमेश लक्ष्मण पिंगळे याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे हे या घटनेचा तपास करत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर तेलंग, पोलिस जवान निखिल रावडे, भास्कर बुधवंत, किशोर शिवणकर यांनी केली आहे.