Pune Bribe पुणे : पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे तत्कालीन उपायुक्त नितिन ढगे व त्यांच्या पत्नीवर अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Bribe)
नितिन चंद्रकांत ढगे (वय-४१, तत्कालीन उपायुक्त तथा कार्यालय सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे) व त्यांची पत्नी प्रतिमा नितीन ढगे (वय ३५, स. स.नं.७१. सीएसटी नं. १४३६, रहेजा गार्डन्स, लव्हेड ए फ्लॅट नं. ५०२, वानवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहे. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक नितीन ढगे यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन २०२१ मध्ये सापळा कारवाई केली होती. त्यावरुन वानवडी पोलीस ठाण्यात भष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी लोकसेवक नितीन ढगे यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता, घरांमध्ये रोख रक्कम १ कोटी २८ लाख ४९ हजार आढळून आली. त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरु होती. उघड चौकशीअंती आरोपी लोकसेवक नितीन ढगे यांनी यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा ४७ टक्के जास्त अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपी लोकसेवक नितीन ढगे यांना त्यांची पत्नी प्रतिमा ढगे यांनी अपप्रेरणा दिल्याने तसेच खोटी माहिती कागदपत्रामध्ये भरुन वापरून शासनाची फसवणुक केली असल्याच्या तपासात उघडकीस आली आहे. म्हणुन आरोपी लोकसेवक नितीन ढंगे व त्यांची पत्नी प्रतिमा ढगे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.