शिरूर : टाकळीहाजी (ता.शिरूर)येथील परिसरातील उचाळेवस्ती येथे हिंदू देवतांबद्दल अपशब्द व अपमानास्पद भाष्य करून,तुमच्या देवांनी काय केलं? तुमच्या देवांमुळे काही फायदा झाला का?” असे म्हणत घरातील काळुबाई व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या फोटोंकडे हातवारे केले आणि ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी मतपरिवर्तन केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भयंकर घटनेची शेतकरी राहुल मारुती गायकवाड(वय ३९,रा. उचाळेवस्ती-टाकळीहाजी,ता.शिरूर, जि.पुणे)यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी प्रशांत जालिंधर घोडे (रा.उचाळेवस्ती-टाकळी हाजी,ता. शिरूर,जि. पुणे), मोजस बार्बनबस डेव्हिड(रा.२०४ लिव्ह गॅलेक्सी, गोकुळ सोसायटी,डोरेबाळा रोडनागपुर ता.जि.नागपुर ), अमोल विठ्ठलराव गायकवाड(रा.प्लॉट नं. १४६९,आयुषी अपार्टमेंट,न्यु नंदनवन नागपुर,ता.जि.नागपुर), योगेश संभुवेल रक्षंत(रा.६/१७,रामबाग कॉलनी, मेडीकल चौक नागपुर,ता.जि. नागपुर), जेसी ऍलिस्टर अँथोनी(रा.२०२ गणराज फोर रेसिडेन्सी,टाकळी,नागपुर, ता.जि. नागपुर), कुणाल जितेश भावणे (रा.बाजारचौक-आंधळगाव, ता.मोहोळ,जि.भंडारा), सिध्दांत सदार कांबळे(रा.रेड्डी इन क्लब मुंढवा, केशवनगर,हनुमान नगर,पुणे)या सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मांतर प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून,हिंदू धर्मावरील अशा योजनाबद्ध हल्ल्यांविरुद्ध पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई करावी,अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.
संबंधित घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,गुरुवारी (१ मे रोजी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राहुल गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत घरासमोर बसले होते.यावेळी प्रशांत जालिंदर घोडे व त्याच्यासोबत सहा अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. “तुम्ही कोणत्या धर्माचे?” अशी विचित्र चौकशी करत,”बायबल वाचा, चर्चमध्ये या,तुमच्यावर प्रभु येशूची कृपा होईल,” असे सांगत धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला.”तुमच्या देवांनी काय केलं?” असा सवाल करत,सात जणांचा टोळकाच उचाळेवस्ती येथील गायकवाड कुटुंबाच्या दारात येऊन बसला! “प्रभु येशूला मान्य करा, चर्चमध्ये या,आर्थिक फायदा होईल,” असे आमिष दाखवत हिंदू धर्म त्याग करण्यासाठी जबरदस्ती सुरू झाली! मात्र फिर्यादी गायकवाड कुटुंबाने ठाम भूमिका घेत “आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार!”असे स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले.तरीही सातही जणांचे हिंदू धर्माविषयी अपमानकारक बोलणे सुरूच होते.
इतकेच नव्हे तर “तुमच्या देवांनी काय केलं? तुमच्या देवांमुळे काही फायदा झाला का?”असे म्हणत घरातील काळुबाई व स्वामी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमांकडे हात करत, अपमानास्पद भाष्य केले. “तुम्ही चर्चमध्ये आल्यावर सर्व आजार बरे होतील,असा प्रचार करत,तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलात,तर आर्थिक मदत करू.” असेही आमिष गायकवाड कुटुंबाला दाखवण्यात आले.
या प्रकारामुळे गायकवाड कुटुंब पूर्णपणे हादरून गेले असून,त्यांनी तत्काळ ११२ वर कॉल डायल करून पोलिसांना बोलावले.पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन टाकळी चौकीत चौकशीसाठी आणले असता,धर्म परिवर्तन करणाऱ्या टोळीने धार्मिक भावना दुखावणे,अमिष देणे, जबरदस्तीने धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणे,असा कट रचल्याचे निष्पन्न झाल्याने त्या सातही जणांच्या विरोधात शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.