सुरेश घाडगे
Paranda News | परंडा : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ८ सदस्य व त्यांच्या बरोबर असलेल्या ४ जणांच्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ सुर्यकांत कांबळे यांच्यासह ४० ते ५० जणांच्या टोळीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या घटनेने परंडा शहर, धाराशिव जिल्हा, सोलापुर जिल्हा व पुणे जिल्हा या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार राहुल मोटे व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडले होते.
परंडा शहर, धाराशिव जिल्हा, सोलापुर जिल्हा व पुणे जिल्हा या परिसरात मोठी खळबळ…
पिस्तूल, कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले. यावेळी त्यांनी रॉड, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत मोबाईल व रोख ३ लाख रुपयेही हिसकावून घेतले व नंतर दुपारी मिरजजवळ सोडून दिले. ही गंभीर घटना बुधवारी (दि.२४) सकाळी ७ वा. सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परंडा बाजार समितीचे शंकर जाधव, जयकुमार जैन, हरी नलवडे, संजय पवार, डॉ . रवींद्र जगताप, दादा घोगरे, सोमनाथ सिरसट, अॅड.सुजित देवकते हे ८ संचालक व त्यांच्या बरोबर असलेले प्रा.शरद झोंबाडे, हरिश्चंद्र मिस्किन, किरण शिंदे, सुदाम देशमुख यांना ४० ते ५० जणांच्या टोळीने मारहाण करून त्यांचे अपहरण केले.
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २९ एप्रिल रोजी पार पडली होती. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतीची निवड बुधवारी (ता. २४) होणार होती. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे १३ सदस्य निवडून आले तर भाजप सेना युतीचे ५ सदस्य निवडून आले.
सभापती उपसभापती निवडीच्या वेळी मतदान करण्यासाठी संचालकावर कोणत्याही पक्षाचा अथवा राजकीय व्यक्तीचा दबाव येऊ नये म्हणून ८ संचालक २१ मे रोजी भीमानगर ता.माढा जि. सोलापूर येथील विश्रामगृहात थांबले होते. बुधवारी (ता.२४) सकाळी ७.१० वा. सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांनी विश्रामगृहाच्या रूमच्या काचा फोडून आत प्रवेश केला.
गजाने संचालकाला मारहाण…
काठी, गजाने संचालकाला मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल व रोख तीन लाख रुपये घेऊन जबरदस्तीने एका गाडीत घालून त्यांना कवठेकंद ता. मिरज येथे नेवून सोडून दिले. ही घटना माजी आ.ज्ञानेश्वर पाटील व राहुल मोटे यांना कळताच त्यांनी सर्व संचालकांना घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठले.यावेळी संचालक जयकुमार जीवराज जैन यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे ( रा. वरुड ता. भूम ), गणेश जगदाळे (रा. खासगाव ता. परांडा ), प्रदीप आजिनाथ पाडुळे (रा. कवडगाव, ता. परंडा ), प्रशांत शिंदे (रा. साकत ता . परंडा ) समाधान मिस्किन (रा. डोमगाव ता . परंडा ), किरण उर्फ लादेन भीमा बरकडे (रा. बुरुडवाडी ), जगदीश ठवरे पाटील (रा. कौडगाव,ता. परंडा ) व इतर अज्ञात 30 ते 35 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करून लोखंडी कुकरी, लोखंडी गज, लाकडी दांडे व हाताने मारहाण केली आहे. यामध्ये संजय लक्ष्मण पवार यांच्या डाव्या हाताची करंगळीला मार लागून फॅक्चर झालं आहे. जर आमचे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
दरम्यान , रेस्ट हाऊसचे दरवाजे खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले. २० हजार रुपयाचा मोबाईल, रोख रक्कम तीन लाख रुपये घेतले. आलेल्या गाडीमध्ये सर्वांना जबरदस्तीने बसवून येथून कवठेकंद येथे हॉटेल डी लाईटचे समोर रोडवर दुपारी २ वाजता धाक दाखवून आम्हाला तेथे सोडले व ते निघून गेले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Paranda News : परंडा शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणा-या नागराळ इंडिया कंपनीचे कंत्राट रद्द
Paranda News : तांदुळवाडी ते देऊळगांव रस्त्यावरील पुलाचे काम करण्याची मनसेची मागणी