उरुळी कांचन, (पुणे): आंतरराष्ट्रीय बाजारातील नामांकित अशा सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Saint-Gobain India Private Limited) या कंपनीच्या बनावट साहित्यांची विक्री करीत असल्याचा प्रकार उरुळी कांचन येथे उघडकीस आला आहे.

मंगळवारी (ता. 27) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गारवा हॉटेल समोर, सोलापुर-पुणे रोडचे बाजुला गट नं. 351 मधील राठोड जिप्सम एजेन्सी येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण सोहनलाल राठोड (वय 26, सध्या रा. कृष्णा बिल्डींग, फ्लॅट नं. 530, डाळिंब रोड, उरुळी कांचन ता. हवेली), मुळ रा. कंदरी, ता. कंदरी, जि. बाजमेर, राज्य, राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साजिद असगरअली अन्सारी (वय 34, काम-नोकरी, रा. स्पाईनरोड, भोसरी, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही सेंट-गोबेन या फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनीची भारतीय शाखा आहे. सेंट-गोबेन बांधकाम आणि औद्योगिक बाजारपेठांसाठी साहित्य आणि सेवा डिझाइन, उत्पादन आणि वितरण करते. साजिद अन्सारी यांना सोलापुर-पुणे रोडच्या बाजुला गारवा हॉटेल समोर, गट नं. 351 मधील राठोड जिप्सम एजेन्सी येथे लक्ष्मण राठोड याचे दुकान व गोडावून आहे. या गोडावूनमध्ये सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बनावट साहित्य तयार करून विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राठोड याच्या दुकानाच्या आतील गोडाऊनमध्ये सेंट-गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनाच्या डीझाईनची कॉपी केलेले बनावट बॉटम, डिझाईन पट्टी व डिझाईन पॅरामिटरचा माल हा गोडावुनमध्ये आढळून आला. तसेच सदरचा माल हा तयार करून ओरीजनल असल्याचे भासवुन विक्रीसाठी साठवणुक केल्याचे आढळून आले.
दरम्यान, याप्रकरणी साजिद अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी लक्ष्मण राठोड याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात प्रतिलीपी अधिकार अधिनियम सन. 1957 चे कलम. 51, 63, 65 व भारतीय न्याय संहिता सन. 2023 चे कलम. 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.







