पुणे : पुणे जिल्ह्यात फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने टोकाचं पाऊल असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर लग्नासाठी तगादा लावताच संबंधित मुलाने जातीवाचक शिवीगाळ करुन तिला नाकारले. या धक्क्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या पीडित मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित आणि आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहेत., त्यांच्यात 2020 पासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. मागील काही महिन्यांपासून पीडित मुलगी आरोपीकडे सतत लग्नाची मागणी करत होती. मात्र, आरोपीकडून सातत्याने टाळाटाळ करत पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली जायची . तू खालच्या जातीची असल्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे म्हणत तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. यानंतर या अल्पवयीन मुलीने नैराश्यात जाऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
दरम्यान या आत्महत्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तसेच बाल न्याय कायद्यानुसार आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने विशेष बाल न्यायालयात प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.







