शिरूर : न्हावरे(ता.शिरूर)परिसरातील तांबेवस्ती येथे दोन अल्पवयीन मुलांकडून शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवसा धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे.संबंधित अल्पवयीन चोर हे ऊस तोडणी मजुरांची मुले असून,त्यांनी सुमारे २ लाख ८०हजार रूपयांची चोरी केली आहे.
संकेत बाजीराव साठे(वय ३०, रा.तांबेवस्ती न्हावरे,ता.शिरूर, जि.पुणे)यांनी घटनेची फिर्याद न्हावरे पोलीस दुरक्षेत्र येथे दाखल केली आहे.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,न्हावरे परिसरातील तांबेवस्ती येथील संकेत बाजीराव साठे हे त्यांच्या घराला कुलूप लाऊन शेतामध्ये कामासाठी गेले होते. दरम्यान,साठे यांच्या घराशेजारी काही अंतरावर ऊस तोडणी सुरू होती. तेथील ऊस तोडणी करणाऱ्या ऊस तोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलांनी साठे यांचे घर बंद असल्याचा फायदा घेऊन घराच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीवर चढून घराच्या छतावर प्रवेश केला.साठे यांचे घर स्लॅबचे असल्यामुळे व घराला आतमधून जिना असल्याने त्या दोन अल्पवयीन चोरांनी घराच्या छतावरून जिन्याने घरामध्ये प्रवेश केला आणि साठे यांच्या घरातील दीड लाख रुपये रोख,एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची चेन व गणपतीची सोन्याची मूर्ती तसेच लहान मुलांनी साठवलेला १० हजार रूपयांचा पैशाचा डब्बा असा एकूण २लाख ८० हजार रुपयांचा ऐवज अल्पवयीन चोरांनी धाडसी चोरी करून चोरून नेला.त्याचप्रमाणे फिर्यादीची आई साधना बाजीराव साठे यांच्या ‘एफडी’च्या पावत्याही अल्पवयीन चोरांनी चोरल्या आहेत.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश कदम हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसऱ्या अल्पवयीन आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे.
दरम्यान शिरूर तालुक्यात व न्हावरे परिसरात अल्पवयीन मुलांकडून विविध गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून,ही बाब अतिशय चिंताजनक आहे.