Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता.०४ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शालेय विद्यार्थी दुचाकीवरून ट्रिपल व फोर्थ सीट लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बिनधास्त जाताना आढळून येत आहेत. मग वाहतूक पोलीस करतात तरी काय? ‘पोलिसांनो, उघडा डोळे बघा नीट’ अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शालेय विद्यार्थी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत बिनधास्त वाहन चालवत आहेत. केंद्र शासनाने वाहतूक नियमभंग कायद्यात वाढ केली असली तरी त्याची अंमलबजावणी लोणी काळभोर शहरात होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून सर्रास नियमांची पायमल्ली केली जात आहे. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोर शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन वाहनचालक करत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलामुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास पालकांना २५ हजार रुपयाचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे. तरीही अनेक पालक आपल्या पाल्यांना गाडी चालवण्यास देतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते आहे. (Loni Kalbhor News)
सध्या शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयात जाताना अल्पवयीन मुलांकडे गाडी देण्याकडे पालकांचा कल असतो. पालकांकडे पाल्याला ने-आण करण्यासाठी वेळ नसल्याने मुला-मुलींना गाडी घेऊन देतात. हल्ली ट्यूशन, कॉलेजला जाण्यासाठी सोपे जावे म्हणून गाडी घेऊन देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बहुतांश मुला-मुलींकडे अशा गाड्या दिसतात. (Loni Kalbhor News)
दरम्यान, आपल्या पाल्याचा हट्ट पुरविण्यासाठी अथवा आपल्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी पालक आपल्या मुला-मुलींना गाडी घेऊन देतात. काही गाड्यांचा वेग अधिक असल्याने ही मुले बऱ्याचवेळा गाडी वेगाने चालवतात. ऐनवेळी काही घडल्यास वेग नियंत्रित करण्याची क्षमता नसल्याने अपघात होतात. त्यामुळे अशा अपघातांना मुख्यत: पालक जबाबदार असतात. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोर परिसरात रोज घुमतो बुलेटचा कर्कश आवाज
अलीकडे कर्णकर्कश व चित्र-विचित्र आवाज करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. बुलेटला जास्त आवाज करणारे सायलेन्सर बसविले जातात. बुलेटच्या कर्णकर्कश आवाजामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांवर धडकी भरण्याची वेळ आली आहे. बुलेटचालक जोरजोरात व अचानक फटाक्यांचे आवाज काढतात. त्यामुळे वयस्कर मंडळी व लहान मुले या आवाजाने घाबरून जातात. (Loni Kalbhor News)
पोलिस दिसताच ‘यू-टर्न’
सुसाट वेगाने जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना एखाद्या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिस थांबलेले दिसताच किंवा नाकाबंदी करून पोलिस वाहनांची तपासणी करत असल्याचे दिसल्यास तत्काळ ही मुले जागेवर ‘यू-टर्न’ मारताना दिसतात. यासाठी अचानक गाडीचा वेग कमी केला जात असल्याने गाडी घसरून किंवा मागे असणारी गाडी धडकल्याने अपघात होण्याचाही धोका आहे. (Loni Kalbhor News)
पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई कधी?
लोणी काळभोर परिसरात वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा केव्हा उगारणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Loni Kalbhor News)