लोणी काळभोर, (पुणे) : लोणी स्टेशन येथील किराणा दुकानदाराला गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली मारहाण करणाऱ्या चौघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच यातील तिघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी शिवम जयपाल सिंग ऊर्फ मुन्ना (वय २७), तुषार संजय थोरात (वय १९), निखिल दिलीप कांबळे (वय १९) व त्यांच्या एका साथीदार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश भिकाराम गोरा (वय २०, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही तरुणांनी गोरा यांना ३ हजार रुपयांची वर्गणीची पावती दिली होती. यावेळी रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास १० ते १५ तरुणांचा गट हा वर्गणी मागण्यासाठी किराणा दुकानात घुसला.
या वेळी गोरा यांनी एवढी रक्कम देऊ शकत नसून, तुम्ही काहीतरी कमी करून घ्या, असे म्हणाले. तेव्हा यातील एकाने त्याच्या कानाखाली जोरदार फटका मारला. पाठीमागे उभे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. तसेच पुन्हा दुकानात घुसून मारहाण केली. लोणी स्टेशन चौकात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, याचवेळी याठिकाणी स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी हा प्रकार पाहिला व त्यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. या वेळी ननवरे यांनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देऊन हुसकावून लावले होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा
दरम्यान, आजुबाजूच्या दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ लोणी काळभोरसह परिसरात व्हायरल झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.