जीवन सोनवणे
खंडाळा, (सातारा) : जमिनीचा वाद आधी सोडवा, नंतर खुरपणी करा, असे म्हणताच आत्या व भाचा शेतातच एकमेकांना भिडले. शेतात जोरदार राडा झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोघे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दत्तात्रय बाळासाहेब महांगरे याला अटक केली आहे.
या घटनेत निलेश पाडुरंग गायकवाड (वय ४०) हा किरकोळ झाला तर संजय पांडुरंग गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत शेत जमीन गट क्र. ६५० फिर्यादी निलेश गायकवाड यांची आत्या कौशल्या बाळासाहेब महांगरे या वाई कोर्टात सुरू असलेल्या वादाच्या शेतात बाजरीच्या पिकात खुरपणी करण्यासाठी आली होती. त्यावेळी निलेश यांनी शेताचा दावा वाई कोर्टात चालू असताना शेतात खुरपण्यासाठी तू का आलीस, असे विचारले.
यावेळी चिडून कौशल्या बाळासाहेब महांगरे हीने फिर्यादी व त्यांची पत्नी आशा हीला शिवीगाळ व दमदाटी केली. त्याचवेळी दत्तात्रय महांगरे याने निलेश याच्या पोटात त्यांच्या हातातील चाकूने भोकसण्याचा प्रयत्न केला. त्याने वार उजव्या हातावर झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला जखम झाली.
फिर्यादी यांचा भाऊ संजय हा त्याठिकाणी आला असता, दत्तात्रय महांगरे यांने संजय यांच्या पोटात हातातील धारदार चाकूने तीन ते चार ठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. या घटनेत एक जण किरकोळ तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दत्तात्रय महांगरे (रा. गायकवाड मळा, भादे, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी दत्तात्रय याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्र करीत आहेत.