बागलकोट, कर्नाटक : श्रद्धा वालकर प्रकरणासारखीच भयानक घटना कर्नाटकातून समोर आली आहे. एका निर्दयी मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केली. आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे ३० तुकडे करून ते बोअरवेलमध्ये फेकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
विठ्ठल (वय २०) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ परिसरात ही घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी आरोपीचे वडील परशुराम यांनी दारू पिली होती. त्यावेळी विठ्ठल व त्याचे वडील परशुराम यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाच्या आवेशातच त्याच्याकडून वडिलांचा खून झाला. या घटनेने आरोपी घाबरला. त्याला वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. त्याने मृतदेह मुधोळ शहराच्या हद्दीत असणाऱ्या शेतातील बोअरवेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्याला वडिलांच्या मृतदेहाला बोअरवेलमध्ये टाकता आले नाही. त्यावेळी त्याने धारधार शास्त्राने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली. आरोपीने मृतदेहाचे तीस तुकडे करून ते शेतातील बोअरवेलमध्ये टाकले.
या कृत्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर शनिवारी तो घरी परतला. आणि त्याने वडिलांशी भांडून आपण घरातून निघून गेल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी वडिलांबद्दल विचारले असता, त्याच्याविषयी कोणतीच माहिती नसल्याचे आरोपीने सांगितले.
कुटुंबीयांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली होती. ते देखील मृत परशुराम यांचा शोध घेत होते. तपासात पोलिसांना आरोपीवर संशय येऊ लागला आणि शेवटी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. आरोपी स्वतःला निर्दोष सांगत होता. मात्र पॉलिसी खाक्या दाखवितानाच त्याने आपण वडिलांची हत्या कशी केली व मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
आरोपीने सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले असता त्यांना मृतदेहाचे तुकडे सापडले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विठ्ठल याला अटक केली आहे.