Indapur News : इंदापूर, (पुणे) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील काम सुरु असताना एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या इसमाच्या अकस्मात मयत प्रकरणाची चौकशी करुन एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व इंदापूरच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
गुन्हा दाखल
श्रीकांत विठ्ठल मोरे (वय ३२ वर्षे, रा. देवडे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, श्रीकांत मोरे यांचे रविवारी (ता. १७) रात्री ९ वाजून १० मिनीटांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तशी नोंद इंदापूर पोलीस ठाण्याच्या अकस्मात मयत दप्तरी करण्यात आली. त्या इसमाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे कारण देण्यात आले नाही.
रविवारी देशपांडे व्हेज या हॉटेलजवळ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम करणा-या एन.पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीने त्या भागात अनेक ठिकाणी खड्डे घेतलेले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये आपल्या दुचाकीसह पडल्याने गंभीर जखमी होवून श्रीकांत मोरे हे मयत झाल्याचा दावा संतोष मोरे यांनी केला आहे.
रस्त्याचे काम सुरु असताना त्या कंपनीने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने मोरे यांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे त्यांच्या मृत्युस सर्वस्वी एन.पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीच जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या कंपनीवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून मयत व्यक्तीच्या कुटूंबाला न्याय मिळवून दयावा अशी मागणी संतोष मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, एन. पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. ही कंपनी ज्या वेळेपासून चालू झाली त्या वेळेपासूनच वादग्रस्त होत चाललेली आहे. तिच्या विरोधात सुमारे दीडशेहून जास्त तक्रारी महसूल व खनिकर्म विभागाच्या टेबलवर धूळ खात पडल्या आहेत. आत्तातर हे नवीन प्रकरण उद्भवल्यामुळे कंपनीविषयीच्या बदलौकिकात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे.