नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने 420 कोटी रुपयांची करचोरी केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना नोटीस पाठवली आहेत. आपल्या विदेश बँक खात्यांचा तपशील तसेच आर्थिक व्यवहार 63 वर्षीय अनिल अंबानी यांनी जाणूनबुजून भारतीय प्राप्तिकर अधिकाऱ्यांसमोर उघड केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
814 कोटी रुपयांपेक्षा अधिक अघोषित रक्कम दोन स्वीस बँक खात्यांमध्ये ठेवून हा कर चुकवल्याप्रकरणी काळ्या पैशा कायद्यांतर्गत खटला चालवण्याची मागणी प्राप्तिकर विभागाने केली आहे.याप्रकरणी अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यायला सांगण्यात आले आहे.
याबाबत अनिल अंबानी यांच्या कार्यातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2012-13 ते 2019-2020 या दरम्यान परदेशी बँकांमध्ये अघोषित संपत्ती ठेवून करचोरी केल्याचा आरोप अंबानी यांच्यावर आहे.
याप्रकरणी कर विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला अनिल अंबानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याप्रकरणात अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा (अघोषित विदेशी उत्पन्न आणि संपत्ती) कर अधिनियम 2015च्या कलम 50 आणि 51अंतर्गत खटला दाखल केला जाऊ शकतो, असे कर विभागाने म्हटले आहे. यात दंडाबरोबरच जास्तीत जास्त 10 वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.