न्हावरे : शिरूर तालुक्यातील कुरुळी ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराप्रकरणी संबंधित भ्रष्टाचारी आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २८ एप्रिल रोजी आदेश देऊनही,शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याकडून गुन्हे दाखल करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली जात आहे.असा आरोप पुणे जिल्हा भाजपा आयटी सेलचे अध्यक्ष नितीन थोरात यांनी केला आहे.
कुरुळी(ता.शिरूर)येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी दिरंगाई केल्यामुळे शासनाने पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह नलावडे यांची ‘पदावनती’ करून,नलावडे यांची यवतमाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बदली केली.त्यामुळे कुरुळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण अतिशय संवेदनशील असताना, शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर मेहरबानी दाखवली जात आहे.
मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे गटविकास अधिकारी डोके यांच्याबाबत तक्रार…..
“कुरुळी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यासाठी शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पाच दिवस विलंब लावल्यामुळे व अद्यापही आरोपींवर गुन्हे दाखल केले नसल्यामुळे शिरूरच्या गटविकास अधिकाऱ्यांची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे केली आहे.असे नितीन थोरात यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.”