सिन्नर : मुलगी अल्पवयीन असताना तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी आई, वडील, भाऊ व नातेवाईकांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहापूर येथील स्वरुपसिंग बहादुरसिंग राठोड (वय 47) यांनी फिर्याद दिली.
राठोड यांच्या खर्डी (जि. ठाणे) या गावातील त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या लहान मुलीच्या लग्राची पत्रिका दिली होती. मात्र, त्यावेळी तिचे वय कमी असल्याने ‘तुम्ही लग्न का लाऊन देताय, हे चुकीचे आहे’, असे सांगितले होते. त्यांनी ‘तुला काय करायचे. आमच्या समाजामध्ये चालते’, असे बोलून ‘तू लग्नाला ये’, असे सांगून टाळाटाळ केली होती.
त्यानंतर पालकांनी 2 मे रोजी मुलीचे लग्न सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील जय भवानी लॉन्स, सिन्नर-घोटी हायवे शिवारात ठेवले होते. त्यानंतर राठोड यांनी मुलीचे आई-वडील व नातेवाईक तसेच मुलाकडील लोकांना मुलगी अल्पवयीन आहे. ‘तुम्ही हे लग्न लाऊ नका’, असे सांगितले. मात्र, राठोड यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. त्यानंतर राठोड यांनी खर्डी येथे मुलीच्या शाळेत जाऊन तेथील रजिस्टरवर जन्म तारखेची खात्री केली असता ती अल्पवयीन असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनदेखील तिचे वडील, आई व इतर नातेवाईकांनी विवाह लाऊन दिला म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.