Daund News दौंड : पुणे शहरात ‘कोयता गँग’ची दहशत कमी होतानाच आता दौंड शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर हातात कोयता घेऊन हवेत भिरकावून दहशत माजवल्याची घटना घडली. भर रस्त्यात हा प्रकार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून दौंड पोलिसांनी याप्रकरणी दोन तरूणांना अटक केली आहे. (Daund News)
राकेश टिळक जगताप (वय २८) व सचिन सुरेश नलावडे (वय ३०, दोघे रा. वडार गल्ली, दौंड) हे हातात कोयता घेऊन शहरातील नगर मोरी ते टपाल कार्यालय या अष्टविनायक मार्गावर दहशत माजवत होते. हातात कोयता घेऊन राकेश जगताप हा या वर्दळीच्या मार्गाच्या मधोमध उभा राहिल्याने दुचाकीस्वार घाबरले होते. अष्टविनायक मार्गावर जेथे लोक जास्त आहेत, तेथे राकेश जगताप दुचाकीवरून खाली उतरून कोयता हवेत भिरकावून नागरिकांना धमकावत होता. याबाबत काही नागरिकांनी दौंड पोलिसांना माहिती दिल्यानंतर गस्तीवरील पोलिस पथकाला कळविण्यात आले. (Daund News)
त्यानंतर पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक चौधरी, हवालदार पांडुरंग थोरात, सचिन देसाई, कॉन्स्टेबल राहुल वाघ व अक्षय डके यांनी राकेश जगताप व सचिन नलावडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता राकेश जगताप याच्या शर्टाच्या मागे पाठीत कोयता लपविल्याचे आढळून आले. याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अरविंद गटकूळ हे करत आहेत. (Daund News)