संदीप टूले
दौंड, (पुणे) : हातवळण येथे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तीन मुले वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली होती केली. दरम्यान तिघांपैकी एकाचा मृतदेह शनिवारी सापडला होता तर रविवारी दोनमुलांचे मृत्यूदेह शोधण्यात पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आले.
विशाल दिलेराम सिंग (वय-१६), निखिल नरेशसिंग कुमार (वय-१५), अमित रामेश्वर राम (वय-१६, ता. तिघेही मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर) अशी या मुलांची नावे आहेत. यातील अमित राम याचा मृतदेह मिळाला होता तर दोघांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. रविवारी सकाळी विशाल व निखिल यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना व ग्रामस्थांना यश आले आहे.
हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय ४५) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल, मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार व निरजकुमार असे सहा जण शनिवारी (ता. ०७) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात पाटस पोलिस चौकीच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छीमार यांच्या होडीतुन व ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले होते. यावेळी शनिवारी अमित राम याचा मृतदेह मिळून आला होता. रविवारी सकाळी एक मृतदेह कानगाव हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तर दुसरा हातवळण हद्दीत शोधण्यात यश आले.
दरम्यान, पाटस पोलीस चौकीतील पोलीस व स्थानिक नागरिकांनी केलेल्या शोध मोहिमेत तब्बल बारा तासानंतर दोन मुलांचे मृत्यूदेह शोधण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह श्ववछेदनासाठी यवत येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपास पाटस पोलीस करीत आहेत.